लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची सुटका करण्यासंदर्भात अंतरिम आदेश द्यावेत, अशी मागणी मलिक यांच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात केली. पोलीस प्रशासन संघटित गुन्ह्यातील सहभागाच्या काल्पनिक आधारावर नावडत्या चेहऱ्याची बदनामी करू शकत नाही, असे माझे म्हणणे आहे, असा युक्तिवाद नवाब मलिक यांच्या वतीने ॲड. अमित देसाई यांनी न्या. पी. बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे केला.
मंत्र्यांनी वादग्रस्त मालमत्ता दोन दशकापूर्वी प्रामाणिक हेतूने विकत घेतली आहे. मात्र, या मालमत्तेची मूळ मालक मुनिरा प्लंबरने पॉवर ऑफ ॲटर्नीबाबत विचार बदलल्याने मलिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा युक्तिवाद देसाई यांनी केला.
मलिक यांची सुटका झाल्यानंतर कधीही आपण अंतिम युक्तिवादास तयार असल्याचे देसाई यांनी म्हणत, न्यायालयाला मलिक यांना अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. मलिक यांनी आधीच १६ दिवस कारागृहात काढले आहेत. त्यामुळे त्यांची सुटका करण्याचे अंतरिम आदेश देण्याची मागणी देसाई यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.