'आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका!'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 04:30 PM2018-10-19T16:30:06+5:302018-10-19T19:53:35+5:30
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई - आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्यामुळे आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना दिलासा मिळाला आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवरआज सुनावणी पार पडली. आपल्याविरोधात कुठलाही पुरावा नाही आणि आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आलेले आहे, असा दावा करत पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी नवलखा यांनी न्यायालयाकडे केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपप्रकरणी नवलखा यांच्यासह प्रसिद्ध तेलगु कवी प्रा. वरवरा राव, कामगार नेत्या सुधा भारद्वाज, मानवी हक्क कार्यकर्ते अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्वीस यांना पुणे पोलिसांनी ऑगस्टमध्ये धरपकड करत अटक केली होती. या अटकेविरोधात काही विचारवंतांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात या प्रकरणाचा निकाल देताना पोलिसांच्या तपासात हस्तक्षेपास नकार दिला होता. पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी देताना न्यायालयाने या विचारवंतांनाही अन्य न्यायालयांत दाद मागण्याची मुभा दिली होती. त्यानुसार नवलखा यांनी नजरकैदेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
आनंद तेलतुंबडे यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका - मुंबई उच्च न्यायालय
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 19, 2018