उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजचा एमएस विद्यार्थी डॉ. कार्तिकेय श्रीवास्तव याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला. याप्रकरणी डॉक्टरच्या बहिणीने तीन डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली.
पोलिस उपायुक्त अभिषेक भारती यांनी सांगितलं की, डॉक्टरची बहीण डॉ. अदिती श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून एसआरएन हॉस्पिटलचे डॉ. शिवम गुप्ता, डॉ. सचिन यादव आणि डॉ. अनामिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरच्या बहिणीने एका सीनियर विद्यार्थ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
या प्रकरणात, पोलिसांनी यापूर्वी सांगितलं होतं की, २८ वर्षीय डॉ. कार्तिकेय श्रीवास्तव, ऑर्थोपेडिक्सचा विद्यार्थी असून शनिवारी रात्री मोतीलाल नेहरू मेडिकलशी संलग्न SRN हॉस्पिटलमध्ये त्याच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आला. एसीपी कोतवाली मनोज कुमार सिंह यांनी रविवारी सांगितलं की, उत्तराखंडचा रहिवासी डॉ. कार्तिकेय श्रीवास्तव याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे.
या प्रकरणी डीसीपी भारती यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेय श्रीवास्तवचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी आहे, त्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजेल. एफआयआरमध्ये, डॉ. अदिती श्रीवास्तव यांनी आरोप केला आहे की, तिचा भाऊ ज्युनिअर होता आणि शिवम गुप्ता हा सीनियर त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे.
कार्तिकेय याने याबाबत एसोसिएट प्रोफेसर (ऑर्थोपेडिक्स) सचिन यादव यांच्याकडे अनेकदा तक्रार केली होती, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीनुसार, कार्तिकेयच्या पायामध्ये समस्या होती. असं असतानाही सचिन यादव याने त्याला ३६ ते ४८ तास उभं ठेवलं. याशिवाय अनामिका नावाची एक मुलगी आहे. जी कार्तिकेयची एक वर्षापासून मैत्रीण होती आणि तिने अचानक त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं.
कार्तिकेयने अनामिकाशी याबद्दल चर्चा केली तेव्हा तिने ती दुसऱ्या कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. यानंतर कार्तिकेयने तिला कधीही फोन केला नसला तरी अनामिका त्याला वेळोवेळी फोन करत होती. अशा स्थितीत कार्तिकेयच्या बहिणीने आपल्या तक्रारीत अनामिकाच्या मित्राने कार्तिकेयची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.