वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला वैतागून तेलंगणातील हैदराबादच्या काकतिया मेडिकल कॉलेज (केएमसी) मधील पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी डॉ. धारावथ प्रीती (२६) हिने आत्महत्या केली. प्रीतीचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तिने पाच दिवसांपूर्वी आपला सिनियर मोहम्मद सैफ याने रॅगिंग केल्यामुळे व्यथित होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. स्वतःला विषाचे इंजेक्शन दिले होते. त्यानंतर रुग्णालयात नेले असता रविवारी तिची प्राणज्योत मालवली.
प्रीतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मोहम्मद सैफ याला अटक करण्यात आली. पण, महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनावर त्यांनी निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यानंतर आता राज्यातले राजकारण तापले असून सोशल मीडियातूनही संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. डी. प्रीतीला न्याय आणि दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारी मोहीम सोशल मीडियावर एका याचिकेद्वारे सुरू झाली आहे.
“भारतातील सर्व संस्थांमध्ये रॅगिंगविरोधात कठोर शिक्षा देण्यासाठी नवीन कायदा बनवला गेला पाहिजे” अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. रॅगिंगच्या तक्रारी गांभीर्याने कधी घेणार, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची ही परिस्थिती असेल तर बाकीच्यांचा विचारच न केलेला बरा, एखाद्याचा जीव जाईपर्यंत कारवाईसाठी वाट का बघायची, कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.