चंदीगढ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काल पंजाबमध्ये जीवघेणा हल्ला झाला. पटियालामध्ये निहंगांनी केलेल्या हल्ल्यात उपनिरीक्षक हरजीत सिंह यांचा तलवारीने हात कापला. यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमधल्या डॉक्टरांना हरजीत सिंह यांचा हात जोडण्यात यश आलं. पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. डॉक्टरांकडून पोलीस अधिकाऱ्यावर यशस्वी सर्जरी करण्यात आलेली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
पंजबाचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) रुग्णालयात यशस्वी सर्जरी झाल्याची माहिती दिली आहे.
संचारबंदीचा पास मागितल्याने तसंच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने निहंगा समुदायातील काही जणांनी पोलिसांवर रविवारी हल्ला केला. या हल्ल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता. आपला कापलेला हात घेऊन हरजीत सिंह दुचाकीवरुन रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्यावर साडेसात तास शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांना हात जोडण्यात यश मिळालं आहे.