पुणे : बाणेर येथील जागेवर अतिक्रमण करण्याच्या वादातून माजी आमदार विनायक निम्हण व त्यांचे पुत्र सनी निम्हण यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांनी दाखल केला आहे़ तर, यापूर्वी सनी निम्हण यांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे़ बाणेर येथील प्लॉट क्रमांक ३६, ६४ जवळ हा प्रकार घडला होता. याबाबत संजय तुकाराम जगताप (वय ३९, रा़ विठ्ठलनगर, सुतारवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यावरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी माजी आमदार विनायक निम्हण आणि माजी नगरसेवक चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या फिर्यादीनुसार संजय जगताप हे ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कामगारांना चहा देऊन खुर्चीवर बसले असताना निम्हण यांनी त्या ठिकाणी येऊन कामगारांना शिवीगाळ करुन जागा काय तुमच्या बापाची आहे काय, असे बोलल्याने जगताप हे खुर्चीवरुन उठले असता आरोपींनी हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या हातावर डोक्यात व पोटावर मारुन जखमी केली़ असे फिर्यादीत म्हटले आहे. संजय जगताप यांच्याविरुद्ध सनी निम्हण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निम्हण यांची बाणेर येथील सर्व्हे नं. ३९/५ येथे जागा आहे. या जागेवर संजय जगताप व त्याच्या इतर साथीदारांनी १ जुलै रोजी दुपारी २ वाजता अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सनी निम्हण व रखवालदार विपुलकुमार सिंग यांनी प्रतिकार केला होता. ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता विपुलकुमार सिंग यांनी फोन केल्याने सनी निम्हण हे त्यांच्या जागेवर पोहचले. तेव्हा संजय जगताप व इतर लोक त्यांच्या जागेच्या बोर्डाला काळा रंग लावण्याचा प्रयत्न करीत होते़ व श्रीकांत दिंगबर कुलकर्णी व कुलदिपसिंग जगजीत सोहल यांच्या नावावर बोर्ड लावण्याचा प्रयत्न करीत होते. इतर लोक पत्र्याचे शेड टाकण्याचे काम करीत होते. सनी निम्हण यांनी संजय जगताप यांना विचारल्यावर त्यांनी हा बोर्ड मला कुलकर्णी यांनी लावायला सांगितले आहे. तू मध्ये पडू नको, नाही तर मी तुला संपवून टाकतो. तुझा बाप वाचला आता मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आमच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न
विनायक निम्हण या सर्व प्रकाराबाबत विनायक निम्हण यांनी सांगितले की, हा सुमारे २० एकरचा प्लॉट असून त्यातील काही जागेची विक्री करण्यात आली आहे. गेली २० वर्षे हा प्लॉट आमच्या ताब्यात असून महापालिकेनेही त्यात काही बदल करायला स्थगिती दिली. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने आपल्याला पॉवर ऑफ ऍटर्नी दिल्याचे संजय जगताप म्हणतो़ या संजय जगताप यानेच आपल्याला यापूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात संजय जगताप याला न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सध्या ते जामीनावर सुटले आहे. त्याची जागा कोठे आहे. ती त्याने शोधावी़ त्यासाठी सरकारी मोजणी करावी़ पण ते सोडून तो आमच्या जागेत अतिक्रमण करत आहे. याबाबत संजय जगताप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ परंतु तो होऊ शकला नाही.