लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : हरिनिवास सर्कल भागातील महादेव टॉवर सोसायटीतील एका पाळीव कुत्र्याने एका २३ वर्षीय तरुणीला चावा घेतल्याचा प्रकार नोव्हेंबर २०१९ मध्ये घडला होता. वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत नौपाडा पोलीस तक्रार दाखल करीत नव्हते. अखेर मुलीचे वडील भरतकुमार पिसाट यांनी ठाणे शहर पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर तक्रार केल्यानंतर या प्रकरणी महेश मोरे आणि त्यांचा मुलगा निरंजन मोरे यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीनिवास सर्कल येथील महादेव टॉवर सोसायटीतील महेश मोरे यांनी पाळलेल्या कुत्र्याने नाजूका पिसाट (२३) हिला चावा घेतल्याचा प्रकार २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास नौपाड्यात घडला होता.नाजूका कामावर जात असताना या कुत्र्याने तिच्या पायाला चावा घेतला होता. तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर तिचे वडिल भरतकुमार पिसाट यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पिसाट यांनी केला आहे.वारंवार पाठपुरावा करुनही गुन्हा दाखल होत नसल्यामुळे अखेर याबाबतची तक्रार ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवर १९ सप्टेंबर २०२० रोजी पिसाट यांनी केली. सोबतच ही तक्रार त्यांनी पोलीस महासंचालकांकडेही केली.
याची दुसऱ्याच दिवशी दखल घेण्यात येऊन ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्याकडे ही तक्रार देण्यास त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी मांगले यांच्याकडे कैफियत मांडली. या प्रकरणी अखेर दहा महिन्यांनी कलम २८९, ३३७ नुसार महेश मोरे आणि निरंजन मोरे या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता तक्रार दाखल झाल्यानंतर पिसाट यांनी मांगले यांचे आभार मानले आहेत.
भरतकुमार पिसाट यांनी श्वानदंशप्रकरणी केवळ आॅनलाइन तक्रार अर्ज दिला होता. लॉकडाऊनमुळे ते प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नव्हते. तक्रारीवर त्यांची स्वाक्षरी अपेक्षित होती. कुत्रा चावल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रही त्यांनी दिले नव्हते. मोरे यांनी कुत्रे पाळायची परवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.- अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे