अमरावती : देशात पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांची तपासणी मोहीम सुरू आहे. त्यानुसार अकोला ते भुसावळ दरम्यान गांधीधाम एक्सप्रेसच्या वॉशरूमध्ये चक्क २६ किलो गांजा आढळून आला. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या चमुतील विरू नामक श्वानाने हा गांजा शोधून काढला, हे विशेष.
गांधीधाम एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०८०३) अप मार्गावर आरपीएफचे जमादार संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे त्यांचा वीरू नामक कुत्र्यासोबत अकोला ते भुसावळ या ट्रेनमध्ये तपासणी ड्युटीवर होते. कर्तव्यावर असतानाआचेगाव स्थानकावरून ट्रेन निघताच कुत्रा वीरूने हा डब्याच्या एस ९ च्या पुढे उजव्या बाजूला असलेल्या वॉशरूममध्ये दोन सोडलेल्या संशयास्पद पिशव्यामध्ये काही संशयास्पद वस्तू ओळखली. याबाबतची माहिती भुसावळ रेल्वे प्रबंधकांना देण्यात आली. ही गाडी भुसावळ स्थानकावर क्रमांक ४ येथे पोहोचताच दोन्ही बेवासर पिशव्या उतरविण्यात आल्या.
या दोन्ही पिशव्यात एकूण १३ बंडल आढळून आले. गांजाचे वजन २६ किलो २५८ ग्राम एवढी असून, अंदाजे एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५८० रूपये आहे. रेल्वेतून वाहतूक होणारा गांजा नेमका कुणाचा याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई भुसावळ आरपीएफचे निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक के.आर.तरड, अनिल कुमा, राज तिवारी, विनोद खरमाटे, सहायक उपनिरीक्षक वसंत महाजन, जमादार विजय पाटील, योगेश पाटील आणि शिपाई धनराज लुले यांनी केली आहे. जप्त केलेला गांजा आरपीएफने नायब तहसीलदार भुसावळ शोभा राजाराम घुले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.