Dolo-650 Controversy: कोरोना काळात ताप कमी करण्यासाठी लोकप्रिय झालेले औषध म्हणजे डोलो-650 नावाची गोळी. पण या ब्रँडबद्दल नुकताच मोठा खुलासा करण्यात आला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes) डोलो-650 औषध निर्मात्यांवर डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांच्या शिफारसीच्या बदल्यात सुमारे १ हजार कोटी रुपयांचे गिफ्ट्स दिल्याचा आरोप केला आहे. ६ जुलैला नऊ राज्यांमधील बेंगळुरूस्थित मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या ३६ कॅम्पसवर छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने हा दावा केला आहे.
धाडसत्रात रोख रक्कम आणि दागिने जप्त
एका निवेदनात CBDT ने सांगितले की, औषध निर्मात्यांवर कारवाई केल्यानंतर विभागाने १.२० कोटी रुपयांची अज्ञात रोख रक्कम आणि १.४० कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले. या संदर्भात मायक्रो लॅबला पाठवलेल्या ई-मेलला कंपनीने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. CBDT ने म्हटले आहे की, धाडसत्रादरम्यान कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात काही महत्त्वपूर्ण व आक्षेप घेण्याजोगे पुरावे सापडले आहेत आणि ते ताब्यात घेण्यात आले आहेत.
ब्रँडचा प्रचार करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर
मंडळाच्या म्हणण्यानुसार, पुराव्यांमधून असे दिसून येते की या ग्रुपने आपली उत्पादने / ब्रँड्सचा प्रचार करण्यासाठी अनैतिक व चुकीच्या पद्धतींचा वापर केला. अशा प्रकारे गिफ्ट्स दिल्याची रक्कम अंदाजे ए हजार कोटी रुपये आहे. CBDT ने अद्याप आपल्या निवेदनात या ग्रुपची ओळख पटवली नसली तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा ग्रुप म्हणजे मायक्रो लॅब असल्याचे सांगितले जात आहे.