डोंबिवली : वार्षिक ११.५ टक्के व्याजाचे प्रलोभन दाखवून एका खासगी म्युच्युअल फंड कंपनीने ३२० ठेवीदारांची एक कोटी ७७ लाख ८९ हजार ९३४ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कंपनीच्या सहा संचालकांविरुद्ध दाखल तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर सिंग, सुनील विश्वकर्मा, कृपाशंकर पांडे, रामअवध वर्मा, राकेश दिवाकर, लालबहादूर वर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. त्यांनी मे. सुप्रिम म्युच्युअल बेनिफिट निधी लिमिटेड कंपनी स्थापन करून पूर्वेतील देसलेपाडा परिसरात त्यांचे कार्यालय उघडले. आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास वार्षिक ११.५ टक्के व्याज देण्यात येईल, असे प्रलोभन दाखविण्यात आले होते. त्याला भुलून पाच हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांची रक्कम संबंधित कंपनीत नागरिकांकडून गुंतविली.
दरम्यान, ठेवीची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी वाढीव व्याजासह मूळ गुंतवणुकीची मागणी सुरू केली. त्यांना कंपनी संचालक, दलालांनी आर्थिक अडचण सांगून गुंतवणूक परत देण्याचे आश्वासन वेळोवेळी दिले गेले. परंतु, गुंतवणुकीची रक्कम दिली जात नव्हती. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. आशिष रंदये यांच्यासह ३१९ ठेवीदारांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. हा सर्व प्रकार जानेवारी २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत घडला आहे.