डोंबिवली – नवरा बायकोच्या भांडणात कुणी तिसऱ्याने पडू नये असं म्हणतात. घरात भांड्याला भांडे लागते परंतु तेच भांडण बाहेर चव्हाट्यावर आले तर त्याचा तमाशा होण्यास वेळ लागत नाही. अनेकदा घरातल्या भांडणाचा त्रास झाला की बाहेरच्या व्यक्तीवर राग, चीड चीड व्यक्त केली जाते. मात्र डोंबिवलीतील घडलेल्या एका प्रकारामुळे सगळेच चक्रावले आहेत. याठिकाणी घरगुती भांडणाचा राग थेट पोलिसांवर काढण्यात आल्याचं समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आधी फोन करून पोलिसांना शिव्या देण्यात आल्या त्यानंतर मारहाण देखील करण्यात आली. अखेर मानपाडा पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे. हेमंत मन्नूभाई कंन्सारा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. हेमंत हा देसले पाड्यातील कुंडल या सोसायटीत राहतो. हेमंतनं नवरा बायकोच्या भांडणाचा राग चक्क पोलिसांवर काढला आहे. हेमंतने मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करून शिवीगाळ केली. मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचा नंबर देखील त्यानं जस्ट डायल वरून मिळवला.
अर्वाच्य भाषेत बोलून शिवीगाळ करणाऱ्या या इसमाचा शोध घेत पोलीस त्याच्या घरी पोहचले. चौकशी सुरू असताना हेमंतने पोलीस नाईक महादेव पवार यांची थेट कॉलरच पकडली. इतक्यावरच तो थांबला नाही तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि पोलीस हवालदार विजय कोळी यांना देखील धक्का मारून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एवढं करूनही या महाशयांचं समाधान झालं नाही. पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलं असता आंधळे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. पोलीस निरीक्षक सुनील डांबरे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.