डोंबिवली: ठाकुर्लीतील बांधकाम व्यावसायिक विनायक पाटील यांचा वाहनचालक चेतन प्रदीप निकम (वय २९) हा सोमवारपासून बेपत्ता होता. या प्रकरणी स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी सातच्या सुमारास पाटील राहत असलेल्या इमारतीच्या वाहन पार्किंगच्या बेसमेंट जवळील गटारात आढळून आल्याने खळबळ उडाली. चेतनला हदयविकाराचा त्रास होत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू हदयविकाराने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पण असे असले तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी वाहने धुण्यासाठी एक जण पार्किंग लॉटमध्ये आला. त्यावेळी त्याला एक विचित्र वास आला. दुर्गंधीचा शोध घेण्यासाठी त्याने आजुबाजुला पाहणी केली असता, पाटील यांचा वाहनचालक चेतनचा मृतदेह गटारात पडल्याचे त्याला आढळून आले. याची माहिती तत्काळ इतरांना देण्यात आली. रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला.
चेतन सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. तत्पुर्वी दुपारच्या सुमारास छातीत दुखत असल्याने तो खाजगी रूग्णालयात तपासणीसाठी देखील गेला होता. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतू संध्याकाळपासून तो कोणालाच दिसला नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचा शोध घेऊनही तो कुठेच आढळून न आल्याने या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह पाटील यांच्या पार्किगच्या बेसमेंट परिसरातील गटारात आढळून आला. चेतनला हदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे, गटाराजवळ लघुशंका करण्यासाठी थांबला असताना त्याला हदयविकाराचा झटका आला असावा आणि तो गटारात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात संशयास्पद असे काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.