डोंबिवली : १५ वर्षीय पीडित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील ३३ आरोपींपैकी २२ जणांच्या कोठडीत बुधवारी पाच दिवसांची वाढ झाल्यानंतर उर्वरित नऊ आरोपींनाच्या पोलीस कोठडीतही गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची, म्हणजेच ५ ऑक्टोबरर्यंत वाढ केली आहे.
या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांच्या पोक्सो विशेष न्यायालयात गुरुवारी ९ आरोपींना हजर केले गेले. यावेळी सर्वांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली. आता २२ आरोपींना सोमवारी, तर ९ आरोपींना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. दुपारी सव्वाचार वाजता आरोपींना न्यायालयात आणले. १५ मिनिटे सरकारी आणि बचावपक्षाचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली.
न्यायालयातील सुनावणीची माहिती देण्यास सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांनी नकार दिला. या गुन्ह्यात आणखी एका आरोपीच्या सहभागाचा संशय असून त्याचा शोध तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाच्या तपासाकरिता कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.
मुलीचे समुपदेशनपीडित मुलीचे समुपदेशन आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून उल्हासनगर येथील चाइल्ड ॲण्ड वूमन वेल्फेअर कमिटीच्या आदेशानुसार तिला बालगृहात ठेवण्यात आल्याची माहिती आहे; परंतु याबाबतही यंत्रणेकडून मौन बाळगण्यात आले आहे.
लॉजबाबत काय तपास? मुरबाड येथील लॉजमध्ये पीडित मुलीवर बलात्कार झाला होता. गुरुवारच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने त्या लॉजबाबत काय तपास केला, असा सवाल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.