डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. विष्णू नगर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेहापाहून काही अंतरावर एक टोपी मिळाली होती. याच टोपीच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपी अर्जुन आनंद मोरे (३९) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अर्जुन मोरे हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी आहे. सध्या तो डोंबिवलीच्या बावनचाळ परिसरात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बावनचाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. व्यक्तीचं वय ४० ते ४५ वर्षाच्या आसपास होतं. डोक्यावर वार करण्यात आल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर एसीपी सुनील कुराडे यांनी तातडीन तीन पथकं नेमली आणि शोध सुरू केला. यात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि ज्या व्यक्तीचा खून झाला तो पाण्याची बाटली घेऊन जात असताना दिसून आला.
मृतदेहाकडून कोणतीच माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. तसंच कोणताही मोबाइल आढळून आला नाही. त्यामुळे ओळख पटवणं मुश्कील होऊन बसलं होतं. पण पोलिसांना ज्या ठिकाणी हत्या झाली होती तिथं एक टोपी आढळून आली होती. हाच धागा पकडून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. हाच टोपीवाला व्यक्ती आपलं सामान गुंडाळून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडलं.
पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्हा केल्याचं मान्य केलं आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला. घटना घडली त्यादिवशी आरोपी दारुच्या नशेत होता. मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत जेवणाच्या मुद्द्यावरुन त्याचं भांडण झालं. भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एका लाकडाच्या काठीनं डोक्यावर आघात केल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं आरोपी अर्जुननं पोलिसांना सांगितलं.