डोंबिवली - रिक्षा थांबवून त्यातील दोघा प्रवाशांवर लुटण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून चोरटयांनी पलायन केल्याची धककादायक घटना ठाकुर्ली परिसरातील रेल्वे समांतर रोडवर घडली आहे. यातील बेचनप्रसाद चौहान या प्रवाशाचा लगतच्या रेल्वे रूळावर छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह आढळुन आला असून दुसरा प्रवासी बबलु चौहान हा जखमी अवस्थेत आहे. बबलुच्या सांगण्यावरून चोरीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असलेतरी बेचनप्रसादचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळल्याने ही हत्या की अपघाती मृत्यू याबाबत संशय निर्माण झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस व लोहमार्ग पोलीसानी तपास सुरू केला आहे.
बेचन आणि बबलु हे दोघेही डोंबिवली पुर्वेतील शेलारनाका परिसरात भाडयाने रहात होते. फर्निचरच्या दुकानात काम करणारे दोघेजण सोमवारी रात्री दिडच्या गाडीने उत्तरप्रदेशला जाणार होते. त्यासाठी त्यांनी शेलारनाका येथून रिक्षा पकडली. दरम्यान त रेल्वे समांतर रस्त्यावरून जात असताना काही व्यक्तींनी त्यांची रिक्षा अडवली आणि दोघांना रिक्षाबाहेर काढत रिक्षाचालकाला पळवून लावले. बेचन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने रस्त्याच्या बाजुला असलेल्या ठाकुर्ली-कल्याण दरम्यानच्या रेल्वे रूळाच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले यावेळी झालेल्या हल्ल्यात बबलूने आपली कशीबशी सुटका करून घेत तेथून पलायन केले. बेचन मात्र त्यांच्या तावडीत सापडला. जखमी अवस्थेतील बबलूने ही माहिती पहाटेच्या सुमारास शेलार नाका गाठत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगितली. प्रकरणाचे गांभिर्य कळल्यावर कांबळे यांनी बबलूला घेऊन टिळकनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी बबलूने दिलेल्या माहीतीनुसार घटनास्थळी धाव घेतली असता त्याठिकाणी बेचनचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. दरम्यान लूटमारीच्या उद्देशाने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज बबलूने दिलेल्या माहीतीमधून मांडला जात असलातरी बेचनची हत्या की अपघाती मृत्यू? याचा शोध पोलिस घेत आहेत. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची या गुन्हयाचा छडा लागण्यात मदत होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.