जळगाव : तुम्ही ऑनलाइन व्यवहार, कर्जाचे प्रकरण किंवा कोणत्या लिंकवर क्लिक करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे. तुमचा वैयक्तिक डेटा केव्हा चोरला जाईल व बँक खाते कधी रिकामे होईल, हे कळणारही नाही. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय काॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचा (सीईआरटी-इन) आधार घेऊन सायबर पोलिसांनी नागरिकांसाठी एक नवीन प्रकारच्या सायबर हल्ल्याबाबत इशारा जारी केला आहे. हा सायबर हल्ला ऑनलाइनबँकिंगला टार्गेट करून केला जात आहे.
अलीकडेच सरकारकडून एक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, सायबर हल्ला करणारे भारतात लोकप्रिय आणि मोठ्या बँकांच्या इंटरनेट बँकिंग वेबसाइटप्रमाणे दिसणाऱ्या फिशिंग वेबसाइट बनवतात आणि फसवणुकीसाठी त्यांचा वापर करतात. यासाठी ‘एनग्रोक’ प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला एखादा मेसेज मिळेल ज्यामध्ये लिहिले असू शकते की, प्रिय ग्राहक, तुमचे बँक खाते निलंबित करण्यात आले आहे. कृपया पुन्हा केवायसी पडताळणी अपडेटसाठी येथे या लिंकवर क्लिक करा. तुम्ही यावर क्लिक करताच, तुमच्या बँकिंग लॉगइन डिटेल आणि मोबाइल नंबर चोरी केला जाऊ शकतो.
अशी होऊ शकते फसवणूक..- अमुक बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे केवायएसी अपूर्ण आहे, त्यामुळे बँक खाते बंद होऊ शकते. असे सांगून आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, दिनांक, वैधता याची पडताळणी करावयाची असल्याचे सांगून गोपनीय माहिती विचारून फसवणूक झाल्याचे प्रकरण सायबर पोलिसांकडे आलेले आहेत.
- ‘एनीडेस्क’ किंवा ‘टीम विव्हर’सारखे कोणतेही ॲप डाउनलोड करणे टाळावे. अशा ॲपसह आपल्या डिव्हाइसवर रिमोट ॲक्सेस देत असल्यास, फसवणूक करणाऱ्यांना आपला पिन, ओटीपी, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती मिळू शकेल. त्यामुळे आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत.
- तुम्हाला ऑनलाइन कर्ज मिळू शकते, त्यासाठी लोन ॲप्लिकेशन डाऊनलोड करा असे सांगितले जाते. तसे केल्यास आपला डेटा चोरी होऊन संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगारांकडे जाते.