जळगाव : घरगुती मीटर व्यावसायिक न करण्यासाठी दोन वेळा पंधरा हजाराची लाच घेतल्यानंतरही लाचेचा मोह सुटलेल्या वीज वितरण कंपनीच्या शोभना दिलीप कहाणे (वय ५६, रा.पवन नगर, ममुराबाद रोड, जळगाव) या महिला टेक्निशियनला दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहात पकडले. दिक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई झाली.
जळगाव शहरातील एका ग्राहकाकडे चार भाडेकरु आहेत. त्याचे मीटर एकच आहे. भाडेकरु असल्याने मीटर व्यावसायिक करावे व त्यासाठी दंड आकारला जाईल असे सांगून महावितरणच्या सीनियर टेक्निशन शोभना कहाणे यांनी कारवाई टाळण्यासाठी ग्राहकाकडे सुरुवातीला दहा हजाराची मागणी केली. या ग्राहकाने त्याची पूर्तता केली. त्यानंतरही कहाणे यांनी पुन्हा पाच हजार रुपयाची मागणी केली. या ग्राहकाने कटकट नको म्हणून पुन्हा पाच हजार रुपये दिले. त्यानंतरही कहाणे यांचा पैशाचा मोह कमी झाला नाही, त्यांनी या ग्राहकाकडे पुन्हा दहा हजार रुपये द्यावे लागतील नाही तर दंड आकाररु असा दम भरला. त्यामुळे या ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जीएम ठाकूर यांची भेट घेत तक्रार दिली.
कार्यालयात लावला सापळातक्रारीची पडताळणी झाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक ठाकूर यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता निरीक्षक निलेश लोधी,दिनेशसिंग पाटील, अशोक अहिरे,सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे,महिला पोलीस अमलदार शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ,जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील,नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने दीक्षितवाडीतील कार्यालयात सापळा लावला. ठरलेल्या नियोजनानुसार दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच शोभना कहाणे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आई काम झाले...लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळा लावलेल्या पथकाने यासाठी इशारा निश्चित केला होता. कहाणे यांनी ही रक्कम स्वीकारतात तक्रारदारांनी बाहेर थांबलेल्या पथकाला मोबाईलवर संपर्क करुन 'आई काम झाले' म्हणून सांगितले. आणि तितक्यात दोघंही बाहेर येत असताना पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.