मुंबई - एटीएममध्ये पैसे भरत असताना ' दो बंडल मशीन मे मत डालो अंकल,नोट फस जयेगी', असे सांगत मदतीचा आव आणुन वृद्धाला ९९ हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बुधवारी दोघांच्या मुसक्या आवळत एक कार आणि रोख रक्कम हस्तगत केली असुन यांच्यावर घाटकोपर पोलिसातही गुन्हे दाखल असल्याचे समजते.
रमेश देवणगाव (३२) आणि फिरोज पठाण (३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. देवणगाव हा व्यवसायाने चालक तर पठाण हा चिकनविक्री करणारा दुकानदार आहे. तक्रारदार किशोरीलाल बिस्सा (६०) हे एका पतंजली प्रोडक्टच्या दुकानाचे मालक गौरव कनोडिया यांच्याकडे कलेक्शन आणि बँकेच्या व्यवहारांचे काम पाहतात. ते ७ जुलै, २०२१ रोजी गोरेगावच्या दिंडोशी येथील बँक ऑफ इंडिया येथे एटीएम मशीनमध्ये कनोडिया यांनी दिलेले ९९ हजार रुपये एटीएममार्फत खात्यात भरण्यासाठी गेले होते. पैसे भरताना त्यांनी कंपनीचा खाते क्रमांक टाकला आणि मशीनचे डिपॉझिट डोअर उघडले. त्याच क्षणी एक इसम तिथे आला आणि पैशाचे दोन बंडल एकाच वेळी आत टाकू नका. अन्यथा नोट अडकेल असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी दोन टप्प्यामध्ये पैसे भरले मात्र त्याच वेळी ५०० ची एक नोट परत आली. ती नोट त्यांनी घेताच मशीनचे शटर बंद झाले मात्र त्याची पावती त्यांना मिळाली नाही. तेव्हा तुमचे पैसे खात्यात जमा झालेत कधीकधी मशीनमध्ये प्रिंटिंग पेपर नसला की असे होते असे अनोळखी व्यक्तीने त्यांना सांगितले. तसेच पैसे जमा झाल्याची खात्री बँकेत जाऊन करून घ्या असेही सुचविले. त्यानुसार बिस्सा बँकेत गेले आणि बँक मॅनेजरला विचारले तसेच पैसे भरल्याची पावती मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र खात्यात पैसे जमा होतील तुम्ही काळजी करू नका असे मॅनेजरने सांगितल्याने बिस्सा हे ऑफिसला निघुन गेले. मात्र संध्याकाळी गौरव यांनी ऑनलाइन बँक खाते तपासले तेव्हा त्यात पैसे जमा झाले नव्हते. बिस्सा यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आणि त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कारच्या नंबरप्लेटमुळे सापडला आरोपी !कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चाळके, सहायक पोलीस निरीक्षक नाईक आणि पथकाने घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. तेव्हा तिघे जण एका कारमध्ये बसत असल्याचे त्यांना दिसले. त्या कारच्या नंबरप्लेट वरून त्याच्या मालकाला संपर्क करण्यात आला. तेव्हा ती देवळगाव याला दोन वर्षापूर्वी विकल्याचे समजले. त्यानुसार त्याला नवी मुंबईतुन ताब्यात घेत अन्य साथीदाराच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.