- प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी विरूध्द अमराठी वाद उफाळला असताना आता इंग्रजी बोलण्यावरून डोंबिवलीत वाद उफाळून आला आहे. एस्क्युज मी बोलू नको, मराठीत बोल असे बोलल्याने उदभवलेल्या वादात तीन तरूणींना मारहाण झाली असून याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिमेकडील जुनी डोंबिवली परिसरातील गणेश श्रध्दा इमारतीत हा प्रकार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे. या इमारतीमधील बी विंगमध्ये राहणा-या पुनम गुप्ता या गीता चौहान या आपल्या मैत्रिणीबरोबर दुचाकीवरून घरी रात्री पावणेदहाच्या सुमारास येत होत्या. त्यावेळी अनिल पवार आणि त्यांची पत्नी असे दोघे ये-जा करण्याच्या रस्त्याच्या मध्ये उभे होते. तेव्हा पुनम यांनी त्या दोघांना बाजुला होण्याच्या उद्देशाने ‘एस्क्युज मी’ असे म्हंटले. यावर त्या दोघांनी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचे नाही मराठीत बोला असे बोलत पुनम आणि गीता यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
यावेळी त्याठिकाणी आलेल्या गीता यांच्या बहिणीला देखील मारहाण केली गेली. दरम्यान पवार यांचे नातेवाईक असलेले आणि इमारतीत ए विंगमध्ये राहणारे बाबासाहेब ढबाले आणि त्यांचा मुलगा रितेश हे देखील वादाच्या ठिकाणी पोहोचले आणि या दोघांनीही मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत पुनम आणि गीता यांनी केला आहे. मराठी अमराठी वाद अधूनमधून होत असताना रोजच्या जीवनात सहज वापरल्या जाणा-या साध्या ‘एस्क्यूज मी’ या इंग्रजी शब्दावरून निर्माण झालेला मोठा वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.