पैठण : अल्पवयीन मुलीस विवस्त्र करून बळजबरीने मोबाईलवर तिला अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग करणाऱ्या बाप, भाऊ व सावत्र आईविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
सातवीमध्ये शिकणाऱ्या पीडित मुलीस सख्खा बाप व भाऊ तिचा विनयभंग होईल, अशी वागणूक देत होते. पीडितेची सावत्र आई व भाऊ या दोघांना विरोध करण्याऐवजी त्यांचे समर्थन करीत होते. घरातील खोलीत तिचे कपडे काढून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार वाढला होता. पीडितेने विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात येत होती. घरच्या लोकांची नजर चुकवून शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी ७ वाजेदरम्यान पीडित मुलगी घरातून पैठण बसस्थानकावर जाऊन बसली. रात्री ९ वाजेनंतर बसस्थानकावरील गर्दी कमी झाल्याने भेदरलेल्या चिमुकलीस रडू कोसळले. ती रडत असल्याचे पाहून काही जण तेथे जमा झाले. रडत रडतच तिने मला घरचे लोक मारून टाकतील. मला पोलीस ठाण्यात घेऊन चला, अशी विनंती केली. तेथील एका जणाने तिला पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन सोडले. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केलीे. उपनिरीक्षक सचिन सानप तपास करीत आहेत.
हरवल्याची तक्रार देण्यासाठी बाप आणि भाऊ ठाण्यात पीडित मुलगी पोलीस ठाण्यात आली तेव्हा घरातून मुलगी हरवली आहे, अशी तक्रार घेऊन पीडितेचा भाऊ व बाप ठाण्यात हजर झाले होते. पीडित मुलीने त्यांना पाहताच पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या कक्षात धाव घेतली. पीडितेची भेदरलेली अवस्था लक्षात घेता पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी तिला विश्वास देत विचारपूस केली. मात्र, ती फक्त रडत होती. बाहेर उभे असलेल्या बाप व भावाच्या भीतीने तिची काही सांगण्याची हिंमतच होत नव्हती. शेवटी पोनि. देशमुख यांनी तिला सुरक्षेची पूर्ण हमी दिल्यानंतर ती बोलती झाली आणि ऐकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मन सुन्न झाले.
मला घरी पाठवू नका सदर मुलीने मला घरी पाठवू नका, अशी विनंती पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याकडे केली. दरम्यान, पीडित मुलीच्या मेव्हण्यास पोलिसांनी फोन करून पोलीस ठाण्यात येण्याची विनंती केली. थोड्या वेळाने पोलिसांनी मेव्हण्यास फोन केला असता तो स्विच आॅफ दाखवत होता. पीडित मुलीस शासकीय महिला व बालविकासगृहात पाठविण्यात आले आहे.