पनवेल - चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व सहा वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला साडेतीन वर्षांनंतर पकडण्यात नवी मुंबईपोलिसांना यश आले आहे. श्रीमंत नागरगोजे (३८) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून संबंधित आरोपीला पणजीवरून अटक करण्यात आली आहे. गुरुवारी परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
१३ जून २०१६ रोजी एका अनोळखी महिलेचा (३०) मृतदेह जेएनपीटी कळंबोली रस्त्यावरील चिंचपाडा उड्डाणपुलावर आढळला होता. यासंदर्भात हनी टाक या कामोठेतील रहिवाशांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसºया दिवशी १४ जून रोजी एका सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह गव्हाणफाटा चिरनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापडला होता. या घटनेची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दोन्हीही ठिकाणच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर संबंधित दोन्ही घटनांमध्ये अपघाताने दोघांचा मृत्यू झाला नसल्याचे उघड झाले होते.
या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार दोघांची निर्घृण हत्या झाल्याचा सुगावा पोलिसांना लागताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान २२ जून रोजी जेजुरी पोलीस ठाण्यात दोघा जणांची मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.बीड येथील मंदाकिनी सानप (४५) यांनी ही तक्रार दाखल केली होती. या वेळी मंदाकिनी यांना दोन्हीही मृतदेहांची ओळख पटविण्यास बोलावल्यावर संबंधित मृतदेह हे सुषमा श्रीमंत नागरगोजे (३०) व सहा वर्षांच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेमध्ये आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून संबंधित प्रकार केल्याचे उघड झाले आहे. आरोपी श्रीमंत नागरगोजे (रा. सातारा) याने पत्नी व मुलीला पत्नीच्या पुणे येथील मामाकडे सोडण्याच्या बहाण्याने आपल्या मालकीच्या एमएच ०६, एसी ५४५२ या ट्रेलरने दोघांना घेऊन पुणे येथे न सोडता थेट नवी मुंबई गाठली. दोघांची निर्घृण हत्या करून संबंधित घटना अपघात झाल्याचे भासवण्यासाठी चिंचपाडा उड्डाणपूल व गव्हाणफाटा येथे दोन्ही मृतदेह फेकून दिले. घटनेनंतर आरोपी श्रीमंत नागरगोजे फरार झाला होता. संबंधित आरोपी गोवा येथे असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली त्याआधारे पोलीस आयुक्त संजय कुमार, सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे तसेच साहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी विशेष पथक स्थापन करून बुधवार, २९ जानेवारी रोजी पणजी-गोवा येथील एका हॉटेलमधून त्याला अटक केली.आरोपीने नाव बदललेदुहेरी हत्याकांडानंतर आरोपी श्रीमंत नागरगोजे हा फरार झाला होता. या वेळी आपले नातेवाईक व मित्रमंडळींशीदेखील संपर्क ठेवला नव्हता. आरोपीने आपले नावही बदलले होते. खोट्या कागदपत्रांच्या आधारे श्रीपाद यादव असे नाव श्रीमंत नागरगोजेने ठेवले होते. नागरगोजे याला न्यायालयात हजर केले असता ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.