कल्याण:
डिसेंबर 2010 मध्ये कल्याणमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी आरोपी संजय नामदेव पाटील याला दुहेरी जन्मठेप आणि 10 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. मागील झालेल्या भांडणाच्या रागातून पश्चिमेकडील रामदासवाडी परिसरातील अशोक आणि कृष्णा देवकर या दोन सख्या भावांची संजयने मनोज खांडगेसह दुचाकीवरून येऊन रहात्या घराजवळच चाकुने वार करून निर्घृण हत्या केली होती. तर देवकर यांचा अन्य एक सख्खा भाऊ रामदास याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
देवकर बंधू रात्रीचे जेवण करून पावणेबाराच्या सुमारास घराबाहेर बसले होते त्यावेळी त्याच परिसरात राहणा-या आणि मनोज खांडगेसह दुचाकीवरून आलेल्या संजय नामदेव पाटील (वय 38)ने तिघा बंधूंवर चाकूने सपासप वार केले. यात अशोक (वय 40)आणि कृष्णा (वय 32)यांचा मृत्यू झाला तर रामदास (वय 42) हे गंभीर जखमी झाले होते. ही घटना 3 डिसेंबर 2010 घडली होती. रामदास यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात संजय आणि मनोज याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण असे गुन्हे दाखल झाले होते.
दोघा आरोपींना 4 डिसेंबरला अटक करण्यात आली. तत्कालीन वरीष्ठ पोलिस निरिक्षक एन के बानकर आणि पोलिस निरिक्षक आर एम आव्हाड यांनी या गुन्हयाचा तपास करून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याचा निकाल गुरूवारी जिल्हा न्यायाधीश आर पी पांडे यांनी दिला. सरकारी वकील म्हणून अश्वीनी भामरे पाटील यांनी काम पाहिले. परिस्थिती आणि वस्तुस्थितीजन्य पुरावा आणि तक्रारदार, पंच, साक्षीदार यांच्या साक्षीच्या आधारे आरोपी संजय पाटीलला दोन्ही भावांच्या हत्येप्रकरणी आणि अन्य एका भावाचा हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेप आणि 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.