नांदुरा : तालुक्यातील जिगाव येथिल दारुड्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीचे वार करून ठार केल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याबाबत आरोपीचा मुलगा संघपाल समाधान तायडे याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समाधान तुकाराम तायडे (वय-५५) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सातत्याने दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. तसेच मृत पत्नी जाईबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्याने जीगाव शिवारात ३ आॅक्टोबर रोजी जाईबाई हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. गळ््यावर कुºहाडीने वार केल्यानंतर मृतदेह दीपक उगले यांच्या शेतात पूरला. रविवारी सकाळी शेतकरी महिला व पुरुष शेतात जात असताना दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी दुर्गंध येत असलेल्या दिशेने पाहणी केली असता महिलेचा मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. नांदुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला. मृत महिलेची ओळख पटली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती समाधानला अटक केली. पुढील तपास नांदुरा पोलिस करित आहेत.
चारित्र्यावर संशय ; पत्नीची हत्या करून मृतदेह शेतात पूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 6:37 PM