लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही विवाहितांभोवती हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असून गेल्या चार महिन्यांत मुंबई पोलिसांच्या दफ्तरी २१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ८६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत चार महिन्यांतील आकडेवारी कमी असली तरी अत्याचाराचा सूर पूर्णपणे थांबलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत मुंबईत महिलांसंबंधित १ हजार ९९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १,४७० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये ३२५ जणी विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. तर, ४०७ जणींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांच्या जीवनशैलीत बदल झाले. चार भिंतीआड कैद झाल्यामुळे कुठे नाती एकत्र आली तर कुठे वादाच्या घटना वाढल्या. हुंड्यासाठीही महिलांचा मानसिक, शारीरिक छळ सुरू असून गेल्या चार महिन्यांत २१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
कांदिवलीत हुंडाबळी कांदिवलीत राहणाऱ्या ममता अशोककुमार चौरसियांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये ममताचा विवाह झाला. विवाहाच्या काही दिवसांनंतर हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. वेळोवेळी मारहाण केली. १५ फेब्रुवारी रोजी ममताचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी ममताचा भाऊ जितेंद्र सीयाराम चौरसिया (३६) यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवत पतीसह सासऱ्याला अटक केली आहे.
पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येते. पोलिस उपायुक्त (महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा) हे महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी असून, त्यांच्या अंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय कक्ष यांचा समावेश होतो. कक्ष २ हा हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्धवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास, तसेच याबाबत प्राप्त तक्रार अर्जांची चौकशी आणि निपटारा करण्याचे काम करतात.
७ जणींची हत्या, ९ जणींची आत्महत्या ७ जणींची हुंड्याव्यतिरिक्त विविध कारणांतून हत्या करण्यात आली. तर ९ जणींनी अन्य तणावातून टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येच्या सातही गुन्ह्यांत आरोपीवर कारवाई केली. तर, आत्महत्येप्रकरणी सहा प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले.
हुंड्याव्यतिरिक्त होत असलेल्या छळाप्रकरणी ६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्यासाठी चौघींचा बळी घेण्यात आला, तर ६ जणींनी आयुष्य संपविले. गेल्यावर्षी याच चार महिन्यांत २९५ गुन्हे दाखल करण्यात आले होते.