वरोरा (चंद्रपूर) : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात व डाॅ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येमागील कारणांचा उलगडा करण्यात पोलिस व्यस्त असून आत्महत्येला २४ तास उलटून गेले तरी गुढ उकललेले नाही. डाॅ. शीतल यांच्या आनंदवनातील कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेज, लॅपटाॅप, मोबाईल, संगणक यासह औषधी व रिकाम्या सिरींज हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोेमवारी दुपारी डाॅ. शीतल यांनी आनंदवनातील घरी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र ठोस पुरावा आढळला नसल्याचे तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी सांगितले. डाॅ. शीतल यांनी मानसिक तणावातून आयुष्य संपविल्याची चर्चा आनंदवनात आहे. मात्र त्यांना मानसिक तणाव कशाचा होता, ही बाब अद्याप अनुत्तरीत आहे.
नाना पाटेकरांकडून सांत्वनडाॅ. शीतल यांच्या मृत्यूची वार्ता सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना कळताच त्यांना धक्का बसला. पाटेकर यांनी आमटे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.
आमटे कुटुंबीयांचे मौनलेकीने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेबद्दल आमटे कुटुंबीयांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला असता ‘आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. ’ एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
आमटे कुटुंबीयांना धक्काडाॅ. शीतल ही आमटे कुटुंबीयांतील एकुलती एक लाडकी लेक होती. तिच्या आत्महत्येने आमटे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. डाॅ. विकास व भारती आमटे यांना शीतल व कौस्तुभ असे दोन अपत्य तर डाॅ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना दिगंत आणि अनिकेत ही दोन मुले आहे. संस्थेच्या व्यवस्थापनावरून आमटे कुटुंबात कलह निर्माण झाला होता. त्यातून शीतल एकट्या पडल्या होत्या. त्यामुळे त्याच मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आनंदवनात आहे.