पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) ९० दिवसांत दोषारोपपत्र सादर केले नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना डिफ़ॉल्ट जामीन देण्यात आला. तीन आरोपींना एकाच वेळी जामीन मिळाल्याने या गुन्ह्याचा तपासावर परिमाण होण्याची शक्यता आहे. पुणे सत्र न्यायालायने हा जामीन मंजूर केला आहे.
सीबीआयचे तपासी अधिकारी दिल्लीतील कामात व्यस्त आहेत. त्यामुळे आम्हाला २० डिसेंबरपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी फेटाळत प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी आरोपींना जामीन दिला आहे. तिघांच्याही अटकेला ९० दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे जामीन मिळावा यासाठी बुधवारी (१२ डिसेंबर) न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली व शुक्रवारी निकाल देण्यात आला. आरोपींचे वकील अॅड. धर्मराज चंडेल यांनी युक्तिवाद केला होता की, अटक केल्यानंतर आरोपींच्या विरोधात ९० दिवसांच्या आत दोषारोपत्र दाखल करणे बंधनकारक असते. मात्र ९० दिवसांच्या कालावधी उलटल्यानंतरही दोषारोपत्र दाखल न झाल्याने डिफ़ॉल्ट जामीन देण्यात यावा. अर्ज दाखल होईपर्यंत सीबीआयकडून दोषारोपत्र दाखल करण्यात आलेले नाही.
दरम्यान या प्रकरणातील सीबीआयचे तपासी अधिकारी दिल्लीतील कामात व्यस्त आहेत. त्यामुळे आम्हाला २० डिसेंबरपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. ती मुदत डिसेंबर अखेरीस संपत आहे. आरोपींवर बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (युएपीए) वाढविण्यात आले आहे. या कायद्यात तपासासाठी १८० दिवस मिळण्याची तरतुद आहे. मात्र ९० दिवस पुर्ण होण्यासाठी अर्ज न केल्याने तीन आरोपींना जामीन मिळाल्याची नामुष्की सीबीआयवर ओढावली आहे.
अमोल काळे हा ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून डॉ. दाभोलकरांच्या गुन्ह्यात त्याला सीबीआयने अटक केली आहे. अंदुरे त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल काळे यान पुरवले होते. हे पिस्तूल औरंगाबाद येथून जप्त करण्यात आले आहे. डॉ. दाभोलकर हत्येतही तो मास्टरमाईंड असावा, असा सीबीआयच्या अधिका-यांना संशय आहे. तर दिगवेकर यांने काळेच्या मदतीने डॉ. दाभोलकर आणि लंकेश यांचा खून झालेल्या ठिकाणांची रेकी केली होती. डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला कुठे आणि किती वाजता जायचे याची माहिती त्याने पुरवली होती. दिगवेकर हिंदू जनजागृती संघाचा साधक आहे. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना बंगेराने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. बंगेरा कर्नाटक येथील शासकीय कर्मचारी असून शिक्षण खात्यात कार्यरत होता. तेथील एका राजकीय व्यक्तीचा स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहत. बंगेरा हा गौरी लंकेश यांच्या हत्येतील देखील आरोपी आहे.