मुंबई - डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जावर गुन्हे शाखेला उत्तर देण्याचे निर्देश देतानाच हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब केली आहे.
या प्रकरणातील तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या वकिलांनी तिघींना जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जामीन अर्ज सादर केला. या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला असला, तरी अद्याप गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आरोपींची चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाला केली आहे. कोर्टाने ही विनंती मान्य करत उद्या याप्रकरणी सुनावणी ठेवली आहे.
डाॅ. पायल आत्महत्या प्रकरणात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तिघींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यानंतर याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.