मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करण्याचे आदेश आह न्या. डी. एस. नायडू यांनी जारी केले आहेत. नव्यानं हायकोर्टात नियुक्त झालेले न्या. डी. एस. नायडू यांनी आपण स्वत: देखील आयपॅडवर सुनावणीचं व्हॉईस रेकॉर्डिंग' करत असल्याचं उपस्थितांना दाखवलं आहे. आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतूदीनुसार खटल्याच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक असल्याची बाब तक्रारदाराचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली. त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. डी. एस. नायडू यांनी मंगळवारी होणारी पुढील सुनावणी रेकॉर्ड करण्याची व्यवस्था करण्याचे हायकोर्ट प्रशासनाला निर्देश दिले.
तसेच हायकोर्टात नवनियुक्त झालेले न्या. डी. एस. नायडूंनी आपण स्वत: देखील आयपॅडवर सुनावणीचे व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याचे उपस्थितांना दाखवले. महत्त्वपूर्ण खटल्यात बोललेली एखादी गोष्टी विसरून जाऊ नये यासाठी आपण स्वत:च्या वापराकरता व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याची न्यायमूर्तींनी भर कोर्टात कबूली दिली. या गोष्टीला सकारात्मक भूमिकेनं बघत नव्या पिढीतील न्यायाधीशांनी सुरू केलेल्या या नव्या हायटेक पद्धतीचं काही वकिलांनी स्वागतच केलं आहे.