मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना आज सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपासासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र पायलच्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. आज न्यायालयात पायलची बाजू मांडणारे वकील नितीन सातपुते यांनी पायलच्या मानेवर, पाठीवर आणि गुप्तांगावर जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले असल्याने ही आत्महत्या नसून हत्या केली असल्याचा दावा केला आहे.
तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी (२६) यांनी २२ मेला गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तिन्ही डॉक्टरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर संबंध राज्यात न्यायासाठी जोरदार मागणी करणारी आंदोलन करण्यात आली आणि सुरु आहेत. पायलचा मृतदेहाचे २३ मे रोजी दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान तब्ब्ल १ तास शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात करण्यात आलं. तसेच व्हिसेरा देखील जतन करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी लॅबमध्ये पाठविण्यात आला असल्याची माहिती वकील सातपुते यांनी लोकमतशी बोलताना दिली. मात्र, पायलच्या मानेवरील, पाठीवरील आणि गुप्तांगावर असलेल्या जखमा नेमक्या कसल्या याचा पाठपुरावा करणार असल्याचे सातपुते यांनी पुढे सांगितले.