डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपींच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेला हायकोर्टाकडून ४ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 04:27 PM2019-06-06T16:27:35+5:302019-06-06T16:29:32+5:30
आरोपींचा ताबा गुन्हे शाखेकडे देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
मुंबई - नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपींचा ताबा गुन्हे शाखेकडे देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. सध्या तिन्ही आरोपी भायखळा जेलमध्ये न्यायालयीन कोठडी असून तिथेच चौकशी करण्याची हायकोर्टाची गुन्हे शाखेला मुभा मिळाली आहे. आज दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आणि पुढील तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आरोपींची चौकशी करण्यास गुन्हे शाखेला हायकोर्टाने मुभा दिली आहे.
गुन्हे शाखेच्या तपास पथकाला जेलमध्येच न्यायालयीन कोठडीत चौकशी करावी लागणार आहे. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी हे तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर आज दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चौकशीसाठी आरोपींचा ताबा गुन्हे शाखेकडे देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी हे पेशाने डॉक्टर आहेत याचे भान ठेवा असं म्हणत कोर्टाने तापस यंत्रणेला फटकारलं आणि सुरूवातीलाच या प्रकरणाचा तपास योग्य अधिकाऱ्यांकडे का दिला गेला नाही?" असा सवाल कोर्टाने केला. नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी पुढील तपासासाठी तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांची दोन दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे होती. ताब्यात घेतल्यापासून आम्ही काहीही केले नाही इतकेच उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे जेल कोठडीत योग्य पद्धतीने चौकशी होणार नाही, अशी मागणी करत गुन्हे शाखेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु आरोपीच्या वकिलांचा याला विरोध होता. तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून जेल कोठडीतच दिवसभर चौकशी करावी अशी आरोपींच्या वकिलांची मागणी होती. सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.