मुंबई - अँटी रॅगिंग कमिटीने डॉ. पायल प्रकरणी आपला रिपोर्ट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सुपूर्द केला आहेे. प्राथमिक चौकशीत डॉ. पायलचे रॅगिंग करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक केली. न्यायालयाने डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीनही डाॅक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, पायलचे वकील नितीन सातपुते यांनी जेजे रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनावर संशय व्यक्त करत पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे केली असल्याची माहिती सातपुते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल ताडवी यांनी 22 मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी रुग्णालयातील डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर भक्ती मेहरेला मंगळवारी अटक केली. तर डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दाेघींना बुधवारी अटक करण्यात आली. नायर रुग्णालयातील डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी एक डॉक्टर पुण्यातून, तर दुसऱ्या डॉक्टरला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी या डॉक्टरांना मुंबई पोलिसांनी न्यायालयात हजर केले न्यायालयाने तीनही डाॅक्टरांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पायलचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले की, डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात अधिक तपास करण्याची गरज असल्याने आम्ही त्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितली. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना तीनही आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पायल तडवी हिचे शवविच्छेदन जे.जे. रुग्णालयातील ज्युनियर डाॅक्टरांनी केले आहे. वैद्यकीय गाईडलाईनचे हे उल्लंघन असून शवविच्छेदन करताना वरिष्ठ डाॅक्टर अथवा असोसिएट प्राध्यापक किंवा सिव्हिल सर्जन उपस्थित नसल्याने शवविच्छेदन याेग्य पध्दतीने झाले नाही असा आराेप वकील सातपुते यांनी केला आहे. दरम्यान, अँटी रॅगिंग कमिटीने डॉ. पायल प्रकरणी आपला रिपोर्ट मंगळवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सुपूर्द केला आहे. प्राथमिक चौकशीत डॉ. पायलचे रॅगिंग करण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचसोबत, रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी वेळीच या प्रकरणी लक्ष िदले असते तर ही घटना थांबविता आली असती असेही म्हणत वरिष्ठ डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच मंगळवारी आमच्याकडे हा प्राथमिक चौकशी अहवाल सुपूर्द करण्यात आला असून या चौकशी अहवालाचा आमची समिती अभ्यास करेल. यानंतरच डॉक्टरांवर कोणती कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापाठाच्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. तसेच याप्रकरणी प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. शिरोडकर यांची बदली करण्यात आली आहे. विभागाचे युनिट हेड डॉ. चिंग लिंग यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारने डॉ. पायल ताडवी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंगळवारी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही कमिटी पाच दिवसांच्या आत राज्य सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याची वकिलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:02 PM
शवविच्छेदनावर संशय व्यक्त करत पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे केली
ठळक मुद्दे वैद्यकीय गाईडलाईनचे हे उल्लंघन असून शवविच्छेदन करताना वरिष्ठ डाॅक्टर अथवा असोसिएट प्राध्यापक किंवा सिव्हिल सर्जन उपस्थित नसल्याने शवविच्छेदन याेग्य पध्दतीने झाले नाही याप्रकरणी प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. शिरोडकर यांची बदली करण्यात आली आहे. विभागाचे युनिट हेड डॉ. चिंग लिंग यांना निलंबित करण्यात आले आहे.