मंगळवारी (दि. ८ जून) बनावट डॉक्टर पदवी प्रकरणात सायकॉलिजिस्ट आणि चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी दुपारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. तपास अधिकारी पीआय पद्माकर देवरे यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्याविरोधात जबाब दाखल करून २६ मे रोजी गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानपूर विद्यापीठाच्या बनावट पदवीबाबत हे प्रकरण आहे, तेथूनच तिने डॉक्टरेट पदवी मिळविल्याचा दावा तक्रारदार गुरदीप कौर यांनी केला आहे. कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय, कानपुर येथून २००९ साली नमूद विषयात पीएचडी केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घातले आणि ते बनावट असल्याची माहिती असताना देखील २०१६ किंवा यापूर्वी त्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी नमूद बनावट प्रमाणपत्र खरे म्हणून वापरले. स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या गुरदीप कौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवली. आज डॉ. स्वप्ना पाटकर यांना अटक करण्यात आली असून उद्या रिमांडसाठी कोर्टात हजर केले जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी लोकमतला दिली.