मुंबई : स्फोटक कार ठेवण्यामागे सचिन वाझे यांच्या कृत्याची माहिती करून घेण्यासाठी एनआयएच्या तपास पथकाने बुधवारी त्यांची अँटिलिया ते ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानपर्यंत परेड घडवून आणली. त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे नाट्यीकरण (रिक्रिएशन) करण्यात आले. ज्या ठिकाणी पुरावे नष्ट केले, त्या जागेची त्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. ठाण्याच्या घरी जाऊन माहिती घेतली. दरम्यान, वाझेंकडे या प्रकरणाचा तपास का देण्यात आला होता, यासाठी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘एनआयए’ला गेल्या चार दिवसांमध्ये सचिन वाझेंच्या या गुन्ह्यातील कृत्याचा पर्दापाश करण्यात यश आले आहे. मंगळवारी (दि. १६) जप्त केलेल्या मर्सिडीजमधून महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. बुधवारी त्यांना घेऊन पथकाने पेडर रोड, माहीम खाडी, तेथून रेतीबंदर आणि त्यांच्या घरी गेले. गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण घटनाक्रम जाणून घेऊन आणखी पुरावे जमविण्यात येत आहेत. वाझे यांनी हा कट कोणाच्या सांगण्यावरून रचला, त्यांना २५ फेब्रुवारीला या तपासाचे अधिकार कोणी दिले, याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, सीआययूच्या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरूच आहे. सलग चौथ्या दिवशी साहाय्यक निरीक्षक रियाजुद्दीन काझी व प्रशांत होवाळे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. वाझेंच्या सांगण्यावरून अंबानींच्या घराच्या परिसरात स्काॅर्पिओ ठेवणे, इनोव्हातून प्रवास करणे, याबाबत विचारणा केली जात आहे.
म्हणे, दरारा दाखविण्यासाठी केले कृत्य!जिलेटिनच्या कांड्या असलेली स्काॅर्पिओ अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यामागील कारणाची वाझेंकडे विचारणा करण्यात येत आहे. त्यांनी २००४ मध्ये जो आपला पूर्वीचा दरारा होता, तो पुन्हा कायम राहावा यासाठी हे कृत्य केल्याचे सांगितल्याचे समजते, मात्र यावर अधिकाऱ्यांचा विश्वास नाही; त्यामुळे ते त्यामागील नेमके कारण जाणून घेत आहेत.
आयपॉड, कॉम्प्युटरमधील डाटा नष्टवाझे यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या आयपॉड, संगणकाची अधिकाऱ्यांनी छाननी केली. मात्र त्यातील डाटा आधीच नष्ट करण्यात आला आहे, आपले कारस्थान उघड होऊ नये, यासाठी त्यांनी ही खबरदारी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाझेंनी वापरलेल्या वाहनांची मुंबई पोलिसांकडूनही झाडाझडती - मुंबई : स्फाेटक कार प्रकरणाचा तपास करीत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने सोमवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयात छापेमारी केली. अशात, मुंबई पोलिसांकडूनही सचिन वाझेंनी वापरलेल्या वाहनांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.- मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारातून ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांची नोंद करण्यात येते. मात्र, अनेकदा ओळखीचा अधिकारी खासगी वाहनातून आल्यानंतर त्याची नोंद ठेवली जात नाही. - त्यामुळे वाझेंनी किती वाहने वापरली याची नोंद पोलिसांकडे नाही, तर दुसरीकडे पोलीस आयुक्तालयात दोन्ही प्रवेशद्वारांवर नजर ठेवण्यासाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने ते सीसीटीव्ही फुटेज एनआयएला सापडले नव्हते. मात्र, एनआयएच्या पथकाने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते. - मुंबई पोलिसांनी अन्य माहितीच्या आधारे वाझेंनी वापरलेल्या वाहनांची माहिती घेत तपासणी सुरू केली आहे, तसेच खात्याअंतर्गतही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.