पुणे - देशासंदर्भातील संवेदनशील माहिती आणि गुपिते पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डी.आर.डी.ओ.) संचालकाला अटक केली. तपासात त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तकाशी संपर्क साधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रदीप कुरूलकर, असे अटक करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी पुणे येथील डी.आर.डी.ओ.च्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्यावर असताना, कुरूलकर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाच्या संपर्कात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. कुरूलकरने पदाचा गैरवापर करून त्याच्या ताब्यात असलेली देशासंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा ठपका ठेवून, त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पुणे एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शास्त्रज्ञाने नेमकी कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली याचा तपास एटीएसकडून सध्या सुरू आहे.
निवृत्तीला सहा महिने होते शिल्लक‘डीआरडीओ’चा संचालक प्रदीप कुरूलकर हा हनीट्रॅपमध्ये अडकल्याने त्याने संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय एटीएसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप व्हॉइस मेसेज, व्हिडीओ कॉलद्वारे तो पाकिस्तानी हस्तकाच्या संपर्कात होता.निवृत्तीला सहा महिने राहिलेले असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मोबाइलच्या माध्यमातून तो पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संवाद साधत असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.