मुंबई - दुबईहून तस्करी मुंबईत आणलेला 110 किलो सोन्याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) डोंगरी आणि झवेरी बाजारात पकडला. या मोठ्या कारवाईत डीआरआयच्या पथकांनी तब्बल 35 कोटी रुपये किंमतीच्या सोन्याच्या साठय़ासह २ कोटींची रोकड हस्तगत केली आणि सात तस्कर आरोपींना अटक केली आहे.
काही तस्करांनी सोन्याचा साठा गुजरातवरून मुंबईत आणला असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआयचे पोलीस उपायुक्त समीर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीआरआयच्या पथकांनी गुरुवार आणि शुक्रवारी डोंगरी, झवेरी बाजारात छापे मारले. त्यावेळी सात तस्कर गळाला लागले आणि त्यांनी बेकायदेशीर आणलेला सोन्याचा साठा आणि जवळजवळ २ कोटींची रक्कम सापडली. 35 कोटींचे सोने व दोन कोटींची रक्कम असा एकूण 37 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे सोने व्यापारी व सोन्याची तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. अटक सात जणांमध्ये दुबईहून सोन्याचा साठा आणणाऱ्या प्रमुख तस्करांचादेखील समावेश आहे. तो दुबईतला राहणारा असून एनआरआय आहे.
तस्करांनी समुद्रामार्गे हा सोन्याचा साठा गुजरातमध्ये आणला होता. तेथील मुद्रा बंदरावर पितळ असल्याचे सांगून आणलेला सोन्याचा कंटेनर क्लिअर करून घेतला. त्यानंतर तो कंटेनर रस्त्याने मुंबईत आणला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेला सोन्याचा साठा पितळेच्या नावाखाली भारतात आणण्यात आला होता.
हे.