मुंबई - नाव्हाशेवा बंदरावरून मलेशियाला रक्त चंदनाची निर्यात केली जाणार असल्याचंही गुप्त माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मिळाली होती. त्यानुसार एका कंटेनरची डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. निर्यात कागदपत्रात पॉलिस्टर धाग्याचे १८.५२२ एमटीज वजनाचे ६४८ कार्टून्स असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, कंसाइन्मेंट उघडून पहिले असता ९०४० किलो वजनाचे वेगवेगळ्या आकाराचे लाकडी ओंडके, ज्याला पॉलिस्टर धाग्याने गुंडाळून लपविण्यात आले होते. तसेच धाग्याचे वजन कमी असल्याने कंसाइन्मेंटमध्ये चंदन असल्याने वजन जास्त होते. त्यामुळे संशयाला वाव मिळू नये म्हणून वजनी सामान असल्याचे भासविण्यासाठी काही तांदळाच्या गोण्या देखील वापरण्यात आल्या होत्या.
इम्पोर्ट एक्स्पोर्ट पॉलिसीअंतर्गत अशा प्रकारे रक्त चंदनाची निर्यात करणं निषिद्ध आहे. डीआरआयने कोटींच्या रक्त चंदन तस्करीचा डाव उधळून लावला आहे. हस्तगत केलेले रक्त चंदनाची किंमत ४ कोटी ५२ लाख इतकी आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे उघड झाले आहे. कस्टम ऍक्ट १९६२ च्या कलम १०४ अन्वये या तस्करीत सामील असलेल्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. चीन आणि जपानसारख्या देशात फर्निचर आणि पारंपरिक आशियाई औषध बनविण्यासाठी रक्त चंदनाची खूप मागणी आहे.