नागपूर : सराईत गुन्हेगार अशी काही चलाखी करतात की सर्वसामान्य व्यक्ती संभ्रमात पडावा. मात्र, तपास यंत्रणा नेहमीच गुन्हेगारांच्या दोन पावलं पुढे असतात. त्यामुळे कारवाईसाठी गेल्यानंतर ते संभ्रमात पडत नाही तर गुन्हेगारांनाच संभ्रमात टाकतात. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने शुक्रवारी आणि शनिवारी (१३ आणि १४ ऑक्टोबर)ला विदेशी सोने तस्करी प्रकरणात काहीसे असेच झाले. आपल्या वाहनातील सोन्याचे बिस्किट कुणीच शोधू शकणार नाही, असा त्यांना विश्वास होता. मात्र, मुंबई आणि वाराणसी या दोन्ही ठिकाणी तस्करांच्या वाहनातील गुप्त लॉकर शोधून डीआरआयच्या पथकाने तस्करांची बोबडीच वळविली.
प्रकरण असे आहे, कोलकाता येथून १२ ऑक्टोबरला आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये काही गोल्ड स्मगलर्स बसल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली. ते कोण, कुठले आणि एवढ्या मोठ्या रेल्वेगाडीत कुठे बसले आहे, त्याची कसलीही दुसरी माहिती डीआरआयकडे नव्हती. मात्र, डीआरआयने सुतावरून स्वर्ग गाठावा, तशी कारवाई केली. रेल्वेच्या आरपीएफ आणि सीआयबीची मदत घेत प्रारंभी नागपुरला आणि येथे पकडलेल्या तस्करांकडून मिळालेल्या माहितीवरून नंतर मुंबई आणि वाराणसी (यूपीकडे पळून गेलेल्या) अन्य तस्करांना पकडले. त्यांच्याजवळ असलेल्या वाहनात अशा काही पद्धतीने सोन्याची बिस्किटे लपविली होती की सर्वसामान्यांच्या ते ध्यानातही आले नसते.
संपूर्ण गाडीची तपासणी करूनही काहीच हाती आले नसते. मात्र, डीआरआयच्या पथकाने सोने तस्करांच्या वाहनांची खास तपासणी केली. वरकरणी तस्करांना आपल्या गाडीतील चोरकप्पे माहिती पडणार नाही, असा आत्मविश्वास होता. कारण पायदानाच्या खाली हॅण्डब्रेकच्या खाली त्यांच्या वाहनांना चोरकप्पे (लॉकर) होते. ते लक्षातच येण्यासारखे नव्हते. त्यामुळे गाडीत काहीच नाही, शोधून घ्या, असा उसणा आव तस्करांनी आणला होता. परंतू डीआरआयच्या पथकाने तस्करांच्या गाडीचे खास चोर कप्पे शोधून काढले आणि त्यात लपवून ठेवलेले कोट्यवधींचे सोनेही जप्त केले. एवढेच काय, तस्करांना अटकही केली.
रोकड असो की सोने,पद्धत सारखीचविशेष म्हणजे, रोकड असो, सोने असो की आणखी कोणती माैल्यवान चिजवस्तू, तस्करी करणारे जवळपास एकसारखीच पद्धत वापरतात. ते आपल्या वाहनांना पायदान, सीटच्या खाली किंवा डिक्कीच्या आतल्या भागात असे विशिष्ट प्रकारचे चोरकप्पे बणवून घेतात आणि बिनबोभाट तस्करी करतात. नंदनवनमधील दीड कोटींच्या हवाला लूट प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या एका वाहनातून हा खुलासा पहिल्यांदा झाला होता. तर, कोरोना काळात एका कंटेनरमधून लाखोंच्या विदेशी मद्याची अशाच विशेष प्रकारच्या चोर कप्प्यातून तस्करी केली जात असल्याचे उघड झाले होते.