मीरारोड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे शासनाने निर्बंध घातले असताना दुसरीकडे दारू आणि बंदी असलेल्या गुटख्याची वाट्टेल त्या भावात काळ्याबाजाराने विक्री करणाऱ्या एका हॉटेल चालकास भाईंदर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांनी हॉटेलच्या आड बेकायदा दारू - गुटखा विकणाऱ्यांच्या तक्रारींवरून कारवाई हाती घेतली आहे. इंदिरा मार्केट मधील रामभरोसे ढाबा मधून सर्रास बेकायदेशीरपणे दारू आणि बंदी असलेला गुरखा विकला जात असल्याची माहिती पाटील याना मिळाली असता त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
पोलीस पथकाने गस्त दरम्यान सदर रामभरोसे ढाब्यात दारू आणि गुटखा विकला जात असल्याची खात्री करून धाड टाकली असता दारूच्या बाटल्या आणि बंदी असलेला गुटखा साठा सापडला. पोलिसांनी आरोपी किशन फुलचंद गुप्ता (३२) यांना अटक करून गुटखा व दारूसाठा जप्त केला. आरोपीच्या विरुद्ध अन्न व औषध कायदा, भादवी आणि कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले गेले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण कदम करत आहेत.