डोंबिवली - पश्चिमेकडील मोठागाव रेतीबंदर रोडवर मोठा गाव ठाकुर्ली येथे रेल्वे फाटकाला एका भरधाव जीपने धडक दिल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. त्या अपघातातरेल्वे फाटक तोडून रेल्वे रूळांमध्ये गेलेल्या स्कॉर्पिओला भगतकी कोठी ते पुणे या लांबपल्याच्या रेल्वेची धडक बसली. त्या धडकेने जीप नजीकच्या रेल्वे केबिनमध्ये घुसली आणि त्या चौकीचेही नुकसान झाले. या अपघातात चालक प्रदीप बांगर, उळंच वाडी, जुन्नर येथे मूळचा रहिवासी असून सध्या कार चालकाचा व्यवसायानिमित्त तो पनवेल येथे बहिणीकडे राहतो, तो अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पनवेल येथे खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर रेल्वे संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोठागाव येथील फाटकाच्या पलिकडील दिशेकडून तो शहराच्या दिशेने येत असतांना हा अपघात घडला. मध्यरात्री पावणेदोन वाजता ही घटना घडली, त्यावेळी लांबपल्याची गाडी येत असल्याने फाटक बंद झाले होते. तरीही चालकाचा तोल सुटल्याने ते फाटक तोडून तो वसईकडे जाणारा पहिला रेल्वे रूळ ओलांडून पुढे गेला, त्यादरम्यान लांबपल्याची पुण्याच्या दिशेने जाणारी गाडीची धडक वाहनाला बसली आणि ते वाहन चौकीत घुसले. त्यामुळे चौकीचे नुकसान झाले आणि फाटक वर खाली करणा-या यंत्रणेचेही नुकसान झाले.सुदैवाने रेल्वे गेटमन त्या अपघातात वाचला असून त्याना कोणतीही इजा झालेली नाही. अपघातानंतर काही वेळाने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जात त्या चालकाला तातडीने उपाचारार्थ शास्त्रीनगर रूग्णालयात हलवले, पण तेथील वैद्यांनी त्यास सायन येथे हलवण्याचे आदेश दिले. परंतू बांगर याच्या कुटूंबियांनी मात्र त्यास खासगी इस्पितळात उपचार करण्याचा निर्णय घेतला. आणि ते त्यास घेऊन गेले. मात्र या घटनेमुले भारतीय संपत्तीचे नुकसान झाले असून रेल्वे अॅक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपासाधिकारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश पवार यांनी दिली. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर चौकशी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे पवार म्हणाले.अपघातात बांगर हा बेशुद्ध झाला होता, त्यामुळे अपघात कसा घडला याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. पण प्राथमिक माहितीनूसार तो एखाद्या कॉलसेंटरमध्ये कार चालक असून भाडे मिळाल्याने तो या ठिकाणी आला होता. तेथून परत जात असतांना त्याचा हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.