नाशिक : मूळ अफगाणिस्तानचे निर्वासित (रेफ्यूजी) भारतीय असलेले ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरीफ बाबा (३५) यांचा नाशिकमधील येवल्यात गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेने संपुर्ण जिल्ह्यासह राज्यात व देशात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि.५) रात्री आठ वाजेच्य दरम्यान ही घटना घडल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. मालमत्तेच्या वादातून चिश्ती यांचा कारचालक व सेवेकऱ्याने संगनमताने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.सोशल मीडियावर सुफी संत म्हणवून घेत प्रसिध्द असलेले जरीफ बाबा यांचा यु-ट्यूब, फेसबुक, टि्वटरवर मोठा चाहता वर्ग आहे. अफगाणिस्तानातून ते चार वर्षांपुर्वी भारतात स्थलांतर करून निर्वासित म्हणून वास्तव्यास आले होते. भारत सरकारने त्यांना निर्वासित म्हणून राहण्याची परवानगी दिली होती, असे जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खोलीत भाडेतत्वावर राहत होते. त्यांच्यासोबत एक विदेशी महिलादेखील वास्तव्यास असून त्या प्रथमदर्शनी अफगानी असल्याचे समोर येत असल्याचे पाटील म्हणाले.
दरम्यान, जरीफ बाबा हे मंगळवारी दुपारी सिन्नरमधून त्यांच्या तीन ते चार प्रमुख सेवेकऱ्यांसह एक्सयुव्ही कारने येवल्यात दाखल झाले. तेथे एक ते दोन पुजाविधीचे कार्यक्रम पार पाडले. यानंतर जेवण केले. चिंचोडी एमआयडीसीमध्ये एका भुखंडाची खरेदी करायची आहे, त्याचे भूमीपूजन करण्याकरिता जायचे असल्याचे सांगून सेवेकरी बाबाला तेथे घेऊन गेले. संध्याकाळच्या सुमारास बाबाला तेथे नेले. पुजाविधी आटोपून ते कारमध्ये बसत असताना कारचालकाने त्यांच्यावर पिस्तुलने गोळी झाडली. गोळी थेट डोक्यात शिरल्याने बाबाचा जागीच मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकच्या ग्रामीण भागातील येवला पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाबाच्या एका सेवेकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच हल्लेखोरांच्या शोधार्थ तपास पथके रवाना करण्यात आले आहेत.