मुंबई - मालाड येथील मालवणी परिसरात पैशाने भरलेली लॉजिस्टिक कंपनीची व्हॅन पळवणाऱ्या चालकास बांगूर नगर पोलिसांनीअटक केली आहे. शेर अली (47) असं या आरोपी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मालाड येथील मालवणी परिसरातील कलेक्टर कंपाऊडमध्ये गार्ड, राहुल खरे आणि अली हे पैसे एटीएममध्ये भरण्यासाठी मालाड पश्चिम येथील हॉटेल पॉपपेज, मिंट चौकी, जुनेत हॉस्पिटल जवळ, लिंक रोड येथे आले होते. व्हॅनमध्ये असलेले लाखो रुपये पाहून अलीच्या मनात हाव निर्माण झाली होती. दरम्यान, दुपारी पावणे एकच्या सुमारास मालाडच्या लिंक रोड येथील एका दुकानात राहुल हा पैसे आण्यासाठी गेला होता. त्यावेळी कट रचून भूक लागल्याचे नाटक करून व्हॅनवरील गार्ड याला भजीपाव आणायला पाठवून अलीने पैशांनी भरलेली गाडी पळवली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने गार्डने याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. ही माहिती कळताच बांगूरनगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी तपास करून शेरअलीला कांदिवली परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडून काही रक्कम हस्तगत केली.
या प्रकरणी बांगूर पोलीस ठाणे गाठत अलीविरोधात तक्रार नोंदवली. व्हॅनमध्ये तब्बल 72 लाख 60 हजार 974 रुपये असल्याचे खरेने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गाडीत असलेल्या जीपीआरएसनुसार पोलिसांनी गाडीचा माग काढण्यास सुरूवात केली. पैशाच्या हव्यासापोटी त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केल आहे.