मुंबई - यंदा थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट असून मुंबई पोलिसांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात नाईट कर्फ्यू असून नववर्षाच्या स्वागतासाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलीस विभागाने देखील थर्टीफर्स्टच्या आदल्या रात्रीपासून दणक्यात कारवाई सुरु केली आहे.
३० डिसेंबर ते ३१ डिसेंबरच्या दुपारी २ वाजेपर्यंत मुंबईत २०९० वाहनांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मुंबई शहरात एकूण ९१ नाकाबंदीची ठिकाणे आहेत. ३० डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते ३१ डिसेंबरच्या दुपारी २ वाजेपर्यंत ऐकून ६ हजार ८० वाहने तपासण्यात आली तर एकूण २ हजार ९० वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर एकूण ४ ड्रंक अँड ड्राईव्हअन्वये कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत सर्वाधिक वाहनांवर कारवाई विक्रोळी येथे करण्यात आली. विक्रोळी येथे १४६, चेंबूर येथे १२८, कांदिवलीत १११ आणि माटुंगा परिसरात १०२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तसेच अन्य प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिथ ऍनालायझरचा वापर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेसाठी वापरत नसून कालपासून आज दुपारपर्यंत ४ दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काळबादेवी येथे २, मुलुंड येथे १ तर माहीम परिसरात १ ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी तैनात वाहतूक पोलिसाला वाहन चालक मद्यपान केल्याचा संशय आल्यास त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेऊन त्याची अल्कोहोल चाचणी करण्यात येते आणि त्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचं वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, ब्रिथ ऍनालायझरचा वापर नसल्याने कारवाईची संख्या घटण्याची शक्यता नसल्याचं पडवळ यांनी पुढे सांगितले.