मुंबई : महानगर मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन हल्ला होण्याची शक्यता असून त्याबाबत सतर्कता बाळगण्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला. राज्यात ड्रोन हल्ल्यांबाबतचे काही जणांचे चॅट डार्क नेटवर्कवर आढळल्यानंतर सर्व खबरदारी घेत असल्याचे सायबरमधील सूत्रांनी सांगितले.
दहशतवादी संघटना अलिकडे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांचा वापर करीत आहेत. त्याबाबत काही समाजकंटकांकडून डार्क नेटवर चॅट केल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, त्यामध्ये अनेक प्राॅक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो, त्यामुळे तो सहजसहजी पकडता येत नाही. त्यावर गेल्या काही महिन्यात, मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिल्याचे समजते. या इशाऱ्याच्या अनुषंगाने सर्व माहिती व आवश्यक प्रतिबंधक योजना कार्यान्वित केली जात आहे.
डार्क वेब म्हणजे काय?
- डार्क वेब म्हणजे आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा छुपा भाग. आपण जे इंटरनेट वापरतो, ज्या वेबसाइटला भेट देतो, त्यांना सरफेस वेबसाइटस् असे संबोधतात. त्या साइड गुगलवर इंडेक्स होतात.
- डार्क वेबवर सहजासहजी कोणाला प्रवेश करता येत नाही. त्यासाठी टोर हा वेब ब्राऊझर वापर जातो. डार्कनेट वेबसाइटचा वेब ॲड्रेस हा वेगळा असतो. विविध डार्कनेट टूल्सचे काम वेगवेगळ्या पद्धतीने चालते.
वाढते सायबर गुन्हे व सायबर हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी बाळगली जात आहे. राज्यात अँटिड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांशी प्रकल्प राबविला जात आहे.- यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर पोलीस