- मंगेश कराळे
नालासोपारा : विजय नगर परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले आहे. पोलिसांनी लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी महिलेला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सपोनि विशाल धायगुडे यांनी गुरुवारी दिली आहे.
तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार उमेश वरठा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विजयनगरमधील साई श्रद्धा अपार्टमेंटच्या, रूम नं. ५ येथील राहत्या घरात एक महिला गर्द, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कारवाई करणेबाबत वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन महोलच्या राहत्या घरी पंचासमक्ष छापा कारवाई केली.
आरोपी महिला गिता उदय स्वामी (५२) हिच्या अंगझडतीत ८ लाख ८० हजारांचा ८८ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ, ५२ हजार ८०० रुपये किंमतीचा १० ग्रॅम ५६० मिली ग्रॅम वजनाचा गर्द (ब्रााउन शुगर) हा अंमली पदार्थ तसेच ६०० रुपये रोख रक्कम असा एकुण ९ लाख ३३ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव आणि तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार योगेश नागरे, आनंद मोरे, आशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, खेमनार, छबरीबन, राऊत, महिला पोलीस हवालदार मेहेर यांनी केली आहे.