लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : भाईंदरच्या लॉजमधून मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या २५ लाखांच्या साठ्यासह चौघांना नुकतीच अटक केल्यानंतर मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पथकाने पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील फार्महाऊसमधील अमली पदार्थ बनविण्याचा कारखानाच शोधून काढला. पोलिसांनी या गुन्ह्यात सात जणांना अटक केली असून, ३६ कोटी ९० लाखांच्या एमडी ड्रग्जसह वाहने, पिस्तूल, काडतुसे जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे यांच्यासह संजय शिंदे, राजू तांबे, संदीप शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत यांच्या पथकाने १८ ऑक्टोबरला भाईंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावरील विन्यासा रेसिडेन्सी लॉजवर छापा टाकला होता.
असे सुरू हाेते ड्रग्जचे रॅकेट
या कारवाईत लॉजमधून सनी भरत सालेकर (२८, बोरिवली पश्चिम), विशाल सतीश गोडसे (२८, कळंबोली), शहाबाज शेवाई (२९) आणि दीपक जितेंद्र दुबे (२६, दोघेही दहिसर) यांना अटक झाली. त्यांच्याकडून २५ लाख १७ हजारांच्या मेफेड्रोनसह रोख रक्कम, पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाइल, वाहने असा एकूण २६ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत तन्वीर निसार अहमद चौधरी (३३, रा. न्यू लवलेश एन्क्लेव्ह, गोल्डन नेस्ट, भाईंदर) याच्याकडून एमडी विक्रीसाठी घेतल्याचे व गौतम गुनाधर घोष (३३, रा. आनंद एन्क्लेव्ह, इंद्रलोक फेस ६, भाईंदर पूर्व) याने एमडी पुरविल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना २१ ऑक्टोबरला अटक केली.
दीड वर्षापासून सुरू हाेता कारखाना
तपासात घोषने समीर चंद्रशेखर पिंजार (४५, रा. नादब्रह्म, वसई) याचे नाव सांगितले. पोलिसांनी समीरला ताब्यात घेत पालघरच्या मोखाडा येथील त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकून तेथील कारखाना उद्ध्वस्त केला. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेला समीर हा फार्महाऊसवर रासायनिक द्रव्य व पावडरवर प्रक्रिया करून एमडी बनवित होता व घोषमार्फत विकत होता. दीड वर्षापासून तो कारखाना चालवत होता. पोलिसांनी तेथून १८ किलो १०० ग्रॅम एमडी तसेच एमडी तयार करण्यासाठीचे रसायन आणि उपकरणे जप्त केली.
आराेपींवर विविध गुन्हे : गौतम घोषवर आधी एक गुन्हा दाखल असून, त्याचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. सनी सालेकर हा कुख्यात गुंड असून, दहिसर-बोरिवलीत त्याच्यावर १८ गुन्हे, विशाल गोडसेवर चार, दीपक दुबेवर नऊ, शहाबाजवर तीन गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.