अतुल शेवाळेनाशिक : गुजरातमधील उंझाजवळील मीरादातार येथून मुंबई नार्को टेस्ट विभागाने अटक केलेल्या ड्रग माफिया रुबीना नियाज शेख हिची मालेगावात ३ बंगले, फार्महाऊस अशी सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. यामुळे ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड झाले आहे. पोलिसांपुढे आता अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
ड्रग एमडी विकण्याचा तिचा मुख्य व्यवसाय आहे. हस्तकांमार्फत ड्रग पुरविले जात होते. राज्यातील विविध शहरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये ड्रग हॅण्डलर्सद्वारे ड्रगचा पुरवठा केला जात होता. ड्रग व्यवसायात मोठा दबदबा असलेल्या शेख हिने मालेगावी तीन बंगले व इतर मालमत्ता जमविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांपुढे ड्रग्स माफियांचे मालेगाव कनेक्शन शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या प्रकरणामुळे मालेगाव पुन्हा चर्चेत आले आहे. दरम्यान, तिची इतकी मालमत्ता पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आणखी काही हाती लागते का याकडे लक्ष लागले आहे.
कुत्ता गोळीची विक्री करून रोवली पाळेमुळेएलसीबीने झोपडपट्ट्यांमधील अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी छापे घातले होते. या तपासणी दरम्यान रुबीना शेख हिचे नाव समोर आले. तिला गुजरातमधून अटक केल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. याप्रकरणी तिचा बॉस निलोफर सांडोले हा फरार आहे. मालेगाव शहरात कुत्ता गोळी व अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. हीच बाब हेरून रुबीना शेखने मालेगावात पाळेमुळे रोवल्याचे दिसून येत आहे.