लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तुमचे पार्सल दिल्ली विमानतळावर अडकल्याचे सांगून फसवणुकीचा घटना घडत असताना, थेट ड्रग पार्सल पकडल्याचे सांगून पोलिस गणवेशात व्हिडीओ कॉल करून तरुणीची फसवणूक करण्यात आल्याची घटना कुर्लामध्ये समोर आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
बदलापूरची रहिवासी असलेली २६ वर्षीय तरुणी कुर्ला येथे नोकरीला आहे. १० मे रोजी तरुणीला एक रेकाॅर्डेड काॅल आला. यात फेडेक्स कुरिअरमध्ये पार्सल आल्याचे व ते परत पाठवीत असून त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी एक अंक दाबा असे सांगण्यात आले होते. तिने एक अंक दाबताच समोरून एक व्यक्ती बोलू लागली. त्याने आपले नाव राहुलकुमार असल्याचे सांगत तैवानवरून विमातळावर एक पार्सल तरुणीच्या नावाने आले आहे. त्यात १५ पासपोर्ट, पाच क्रेडिट कार्ड, २०० ग्रॅम एमडी आणि काही कपडे आहे. यावरून तुमच्या विरोधात गुन्हा नोंदवला असल्याचे सांगितले.
पोलिस कॉल करतील असे सांगून राहुल कुमारने कॉल कट केला. काही वेळाने तिला मोबाइलवर व्हिडीओ कॉल आला. त्यामधील व्यक्ती पोलिस गणवेशात होती. तुमच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगचे अटक वॉरंट असल्याचे त्याने दाखविले. तसेच, ९८ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. तिने घाबरून बँकेतील सर्व ६४ हजार ६८८ रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली. अखेर, यामध्ये फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.