लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केशकर्तनकार मोहम्मद शाहरुख शफी शेख (२८) याला ड्रग्ज तस्करीप्रकरणी घाटकोपरच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यानंतर, त्याच्या चौकशीतून विदर्भातील ड्रग्ज कनेक्शन उजेडात आले आहे. तो कुरिअरद्वारे नागपूरसह विविध ठिकाणी एमडी ड्रग पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्याला ड्रग्ज पुरविणाऱ्या डोंगरीतील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
घाटकोपर पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वात पथकाने वरळी येथून मोहम्मदला गुरुवारी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तब्बल १ कोटी ९९ लाख किमतीचे ९९५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. त्याने, डोंगरीतील दोन आरोपींकडून हे एमडी घेतल्याची माहिती पथकाला दिली आहे. त्यानुसार, पथक यामागील आरोपींचा शोध घेत आहे.
शेख याला दोन पत्नी आहेत. पत्नी, मुलांच्या उदरनिर्वाहासह झटपट श्रीमंत होण्यासाठी तो ड्रग्ज तस्करीच्या साखळीत उतरला. टक्केवारीवर एमडी घेऊन विदर्भातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत होता. गेल्या दोन वर्षांपासून कुरिअरद्वारे त्याचे ड्रग्ज पार्सल नागपूरसह विविध ठिकाणी रवाना होत होते. जप्त करण्यात आलेले ड्रग्जही नागपूरला पाठविण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला ब्रेक लावला. त्याने, आतापर्यंत कुणाला किती ड्रग्ज दिले? यामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे? याबाबत पथक कसून चौकशी करत आहे.
‘तो’ ड्रग्जचा कारखानाही उद्ध्वस्त एएनसीच्या घाटकोपर पथकाने गेल्या महिन्यात मुंबईत गांजा तस्करी करणाऱ्या मुंबईसह पेण, रत्नागिरीमधील आरोपींची धरपकड केली. यामध्ये कारवाईची कुणकुण लागताच प्रशांतने माल खाडीत फेकून देण्यास सांगितला. पथकाने ३ फूट चिखलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही हाती लागले नाही. अखेर ज्या आरोपीला गांजा फेकून देण्याची जबाबदारी दिली त्याने त्यातील अर्धा किलो माल बाजूला काढून तो विकण्याचा प्रयत्न केला आणि यातच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहितीही समोर आली. सध्या गुन्हे शाखेने त्यांची अलिबागमधील ड्रग्ज फॅक्टरीही उद्ध्वस्त केली आहे.