सुशांत कुंकळयेकर
मडगाव - टुरिस्ट गाईडच्या नावाखाली प्रत्यक्षात ड्रग पेडलिंगचा धंदा करणाऱ्या जितीन जोजफ (33) व सोजन सायमन (27) या दोन केरळी युवकांना सोमवारी रात्री मडगाव रेल्वे स्थानक परिसरात मडगाव पोलिसांनीअटक करुन त्यांच्याकडून गांजा व हॅश ऑईल असा एकंदर दहा लाखांचा अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
विशाखापट्टणमहून सुटलेल्या अमरावती एक्सप्रेसमधून दोन युवक अमली पदार्थ घेऊन गोव्यात येत आहेत याची माहिती मडगाव पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर साध्या वेषातील पोलिसांचा सापळा लावून ठेवला होता. हे दोन्ही युवक त्यात अलगद सापडले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यांच्याकडे गांजा व हॅश ऑईल (गांजाच्या पानापासून तयार केलेले तेल) सापडले.
मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मागच्या दोन महिन्यांपासून हे दोन्ही संशयित गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना हेरुन त्यांना अमली पदार्थ विकायचे. प्रत्यक्षात हे दोन्ही युवक टुरिस्ट गाईड म्हणून काम करत होते. मात्र टुरिस्ट गाईडच्या नावाखाली दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात चालू असलेल्या मसाज पार्लरसाठी ते दोघेही ग्राहके पुरवायचे. याच मसाज पार्लरवर येणाऱ्या पर्यटकांना ते अमली पदार्थही विकायचे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो पलक्कड - केरळ येथील या दोन्ही युवकांचा मागची तीन वर्षे गोव्यात वास्तव असून काही महिन्यापूर्वीच त्यांनी ड्रग पेडलिंगच्या धंद्यातही पाऊल टाकले होते. आंध्र प्रदेशातून गांजा आणून ते गोव्यात विकायचे. सध्या या दोन्ही युवकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
असा व्हायचा हॅश ऑईलचा वापर
गांजाच्या पानापासून जे तेल तयार करतात त्याला ड्रग व्यावसायिक हॅश ऑईल म्हणून ओळखतात. या तेलाचा वापर सिगरेटमधून किंवा दारुमधून नशा चढण्यासाठी केला जातो. सिगरेटवर या तेलाचा एक थेंब टाकून ती ओढल्यास नशा मिळू शकते. काहीजण व्हिस्कीतही या हॅश ऑईलचा थेंब टाकून नशापान करायचे. या तेलाचा रंग काळा असतो. या संशयितांनी प्रत्येकी दहा ग्रॅमच्या बॉटलमध्ये सुमारे 1.345 किलो हॅश ऑईल विशाखापट्टणमहून आणले होते. ही दहा ग्रॅमची बाटली ते प्रत्येकी 5 हजार रुपयांना पर्यटकांना विकायचे.