मुंबई : एनसीबीची ड्रग्ज तस्करावर धड़क कारवाई सुरु असताना अंधेरी येथे एका कारवाईत ड्रग्ज तस्कर आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा पाठलाग करताना दोन अधिकारी जखमी झाले. यात एका ड्रग्ज तस्कराने अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची एखाद्या हिंदी चित्रपटातील थरारक दृश्याप्रमाणे रंगणारी घटना गुरूवारी घडली. यात एका तस्कराला अटक करण्यास एनसीबीला यश आले असून, अन्य पसार साथीदारांचा शोध सुरु आहे. एहसान खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेड़े यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी अंधेरीच्या वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट रोड परिसरात ३ तस्कर येणार असल्याची माहिती मिळताच, पथकाने सापळा रचला. तस्कर ड्रग्ज देण्यासाठी दुचाकीवरून तेथे धड़कताच पथकाने त्यांच्याकड़े धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून त्यांनी दुचाकीवरून पळ काढ़ला. जवळपास अडीच किलो मीटर अंतरापर्यन्त पाठलाग करूनही दोन तस्कर पळण्यास यशस्वी झाले. तर दुसरीकडे एका अधिकाऱ्याने अन्य एका तस्करावर झड़प घातली.
एनसीबीच्या अधिकाऱ्याने त्याला पकडताच त्याने २०० मीटर अंतरापर्यंत त्या अधिकाऱ्याला फरफटत नेत पळ काढ़ला. यात, तो अधिकारी जखमी झाला आहे. तर आणखीन एका तस्कराने दुचाकीवरून उड़ी घेत, रहिवासी इमारतीच्या दिशेने पळ काढ़ला. अधिकाऱ्याने त्याचा पाठलाग करत त्याला पकड़ले. या दरम्यान तस्कराने अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अधिकारी जखमी झाला मात्र त्याने तस्कराला बेडया ठोकल्या. त्याच्याकड़ून ६२ ग्रँम एमडी जप्त करण्यात आला आहे.